राहुरी। नगर सहयाद्री-
जिल्ह्याच्या वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राहुरी कार्यालयात कार्यरत असलेले तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.
तहसीलदार चंद्रजित राजपूत हे राहुरीत कार्यरत झाल्यापासून नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. राजपूत यांच्या कार्यपध्दतीवर राहुरीतील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते नेहमीच सोशल माध्यमांवर नाराजी व्यक्त करीत होते.
राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे कारखान्याच्या मालकीच्या जमिनीतून मुरूम उत्खनन प्रकरणी त्यांचे व मुरूम वाहतूकदारांच्या अर्थपूर्ण संबंधाची चर्चा राहुरी फॅक्टरी परिसरात सुरू असतानाच ते निलंबित झाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जून ते ऑक्टोबर २०२० साली अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले आहे. त्याच्याविरुध्द शासन ज्ञापन दि.२०.११.२०२३ अन्वये म.ना. से (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ व १२ अन्वये विभागीय चौकशी सुरु होती. त्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये चंद्रजित राजपुत यांना तात्काळ शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीतील त्यांना मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे राहुन त्यांनी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये. असे आदेश श्री राणे यांनी दिले आहे.