छत्रपती संभाजीनगर | नगर सह्याद्री
पडेगाव, कासंबरी दर्गा भागात किरकोळ कारणावरून कादियानी आणि सुन्नी पंथियाच्या दोन गटांत सोमवारी (ता. २२) तुफान दगडफेक, लाठाकाठ्या, रॉडने मारामारी झाली. दुपारी तीन वाजता हा प्रकार घडला. जमावाला आटोयात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूर आणि हँडग्रेनेडचा वापर केला. घटनेनंतर दोन्ही गटांतील ६३ संशयितांना अटक केली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दंगलीचा गुन्हा नोंदवला.
या घटनेत १३ जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पहिल्या गटाच्या वतीने शेख आरेफ शेख उस्मान (वय ४३, रा. पडेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरेफ यांचा भाऊ लतीफ पडेगाव भागात गट क्रमांक ९२ मध्ये राहतो. या गटाच्या शेजारी असलेल्या गट क्रमांक ९१ मध्ये कादियानी पंथाची वस्ती आहे.
आरेफला भावाच्या घरी जाण्यासाठी गट क्रमांक ९२ मधून जावे लागते. सोमवारी दुपारी कादियानी समाजाच्या जमावाने आमच्या वस्तीतून का येणे-जाणे करता?, असे म्हणत आरेफ आणि इतरांवर लाठ्याकाठ्या, रॉड, तलवारीने हल्ला करीत दगडफेक केली. या प्रकरणी आरेफ यांच्या तक्रारीवरून ५० जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. या प्रकरणी पोलिसांनी ३७ संशयितांना अटक केली.
याच प्रकरणात दुसर्या गटाचे मोहम्मद झिशान नजर मोहम्मद (वय ३५, रा. पडेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घराजवळ काही मुले येऊन बसत होती. सोमवारी दुपारी झिशान त्यांना समजावून सांगत असताना एका मुलाने आईला बोलावून आणले. यावेळी वाद झाल्याने दुसर्या गटातील जमावाने झिशान आणि इतरांवर हल्ला करीत दगडफेक केली. या प्रकरणी शंभर ते सव्वाशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
यामध्ये २७ संशयितांना अटक केली आहे. या दंगलीमध्ये तेरा गंभीर जखमी झाले आहेत. या दंगलीची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले. पोलिसांनाही दंगेखोर जुमानत नव्हते. उपायुक्त बगाटे यांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधूर, हँडग्रेनेडचा वापर करीत लाठीमार केला. नंतर संशयित दंगेखोरांना ताब्यात घेतले.