नगर सह्याद्री वेब टीम
Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस विमानाचा अपघात झाला आहे. दुपारी एअर शो सुरू असताना तेजस लढाऊ विमान कोसळले. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ने (एचएएल) तयार केलेले हे विमान शुक्रवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार २.१० वाजता हवाई कसरती करत असताना कोसळले. यावेळी हवाई प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळलेली होती.
भारतीय हवाई दलाने सदर अपघाताची कबुली दिली असून अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. हवाई दलाच्या निवेदनात म्हटले, “दुबई एअर शो-२५ मध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस विमान कोसळले. अधिक तपशीलाची खात्री केली जात आहे, लवकरच संपूर्ण माहिती दिली जाईल.”
व्हायरल व्हिडीओ अपघाताची भीषणता दिसून येत आहे. आकाशातून वेगात येणारे तेजस जमिनीवर कोसळल्यानंतर लगेचच आगीचा गोळा आणि त्यानंतर काळा धूर वर आल्याचे पाहायला मिळत आहे. या अपघातानंतर एअर शो पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघात होण्यापूर्वी वैमानिक सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाला की नाही, याची स्पष्टता अद्याप झालेली नाही.



