मतदार संघातील महिलांमध्ये संतापाची लाट ; तालुक्यात फिरु न देण्याचा इशारा!
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
नगर तालुक्यातील जेऊर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ शनिवार दि १६ रोजी झालेल्या सभेत माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी आपल्या भाषणातून मतदार संघातील महिलांविषयी अपशब्द वापरल्याने सर्व महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मोकाटे यांना मतदार संघात फिरू न देण्याचा इशारा महिलांच्या वतीने देण्यात आला आहे.
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ १६ नोव्हेंबर रोजी जेऊर येथे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना गोविंद मोकाटे यांनी बहिरवाडी, शेंडी तसेच मतदार संघातील महिलांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केल्याचा आरोप जेऊर गटातील महिलांकडून करण्यात आला आहे. गोविंद मोकाटे यांनी आपल्या भाषणात मतदार संघातील महिलांविषयी अपशब्द वापरल्याने त्याचे तीव्र पडसाद मतदारसंघात ठीक ठिकाणी उमटू लागले आहेत. त्यांनी केलेल्या भाषणाची रेकॉर्डिंग पाहून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महिलांकडून करण्यात येत आहे.
मोकाटे यांनी महिलांच्या चारित्र्या विषयी बोलण्या अगोदर स्वतः काय उद्योग केले आहेत हे दोन वर्षांपूर्वी जगजाहीर झाले असताना दुसऱ्यावर आरोप करण्या अगोदर स्वतःचे चारित्र्य तपासावे असाही सल्ला महिलांमधून देण्यात येत आहे. आमदार प्राजक्ता तनपुरे हे विजयासाठी मतांची जुळवाजुळव करत असताना मोकाटे यांनी केलेल्या वक्तव्याने मतदार संघातील सर्व महिलांमध्ये चीड निर्माण झाली असून त्याचा मोठा फटका तनपुरे यांना बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गावागावातून मोकाटे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. मोकाटे हे भाषण करत असताना खासदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे काम मोकाटे करत असताना या नेत्यांनी त्याला अडवले नाही. याचा अर्थ या उमेदवारांचे महिलांविषयी असलेले बेगडीप्रेम समोर आले आहे. त्यामुळे खासदार निलेश लंके व आमदार प्राजक्त तनपुरे यांचाही महिला वर्गांकडून निषेध करण्यात येत आहे. मोकाटे यांच्या वक्तव्याने मतदारसंघातील सर्व महिलांमध्ये मोठी चिड निर्माण झाली असून त्याचे तीव्र पडसाद मतदारसंघात उमटत आहेत. मोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील महिला वर्गांकडून करण्यात येत आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना व्यासपीठावर घेऊन प्रचार करण्याची वेळ विद्यमान आमदारावर आल्याने यांना महिलांकडून फक्त मते हवी आहे परंतु त्यांच्याविषयी आदराची भावना नसल्याचे मत महिला व्यक्त करत आहे. दुसऱ्यावर आरोप करण्या अगोदर स्वतःचे चारित्र्य तपासण्याचा सल्ला ही महिलांकडून देण्यात आला आहे. मोकाटे यांच्या वक्तव्याने तनपुरे यांच्या अडचणीत वाढ झाली असून महिलांचा प्रचंड रोष पहावयास मिळत आहे. त्यामुळे मतदारसंघातील चित्र बदलणार असून मोकाटे यांच्या वक्तव्याचा मोठा फटका तनपुरे यांना बसणार असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. जेऊर गटातील महिलांकडून लवकरच जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे.