Walmik Karad: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला बीड जिल्हा कारागृहात मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बीडच्या कारागृहात सकाळी कैद्यांच्या दोन गटामध्ये तुफान राडा झाला. यावेळी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करण्यात आली. कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बीडच्या जिल्हा कारागृहात सोमवारी सकाळी कैद्यांमध्ये वाद झाला. कारागृहातील कैद्यांच्या दोन गटांमध्ये आज सकाळी शाब्दिक चकमकीतून हा वाद झाला. या वादातून एकमेकांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. जेलमधील पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने वातावरण निवळलं. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी अटक असलेल्या आरोपींमध्ये हा वाद झाल्याची माहिती जेल प्रशासनाने दिली. बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
वाल्मीक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागरामध्ये 9 नंबरच्या बराकमध्ये आहे. सुदर्शन घुले आणि इतर आरोपी देखील याच जिल्हा कारागरामध्ये आहेत. याच कारागृहामध्ये परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते देखील या जिल्हा करागरामध्ये असून आरोपी वाल्मीक कराड आणि महादेव गीते यांचे जुनेच वाद असून हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. सरपंच बापू आंधळे यांची भर दिवसा चौकामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी महादेव गीते आणि इतर आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती.