नवी दिल्ली / नगर सह्याद्री : लोकसभा निवडणुकांच्या तारखा शनिवारी म्हणजे उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. लोकसभा निवडणुकांसोबतच सिक्किम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्याही तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. लोकसभेचा कार्यकाळ १६ जूनला संपत आहे, त्याआधी निवडणुका पूर्ण होण्याची आवश्यकता आहे.
नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. सर्व विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षानेही त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. गेल्या वेळी 2019 मध्ये, सार्वत्रिक निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यांत पार पडल्या आणि 23 मे रोजी मतमोजणी झाली होती.