मुंबई । नगर सहयाद्री:-
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.31 जुलै) मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. आज विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून निकालाचे वाचन करण्यात आले. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, यांच्यासह 7 जणांवर याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मालेगाव बॉम्ब ब्लास्ट; 17 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?
29 सप्टेंबर 2008 रोजी रमजान महिन्यात मालेगावमध्ये झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते.
मशिदीजवळ पार्क केलेल्या दुचाकीत स्फोट झाला.
भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकण, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आरोप.
19 एप्रिल 2024 रोजी सुनावणी पूर्ण; न्यायालयाने निकाल राखून ठेवला.
आरोपींना योग्य शिक्षा देण्याची एनआयएची मागणी.
31 जुलै 2025 रोजी न्यायालयाचा अंतिम निकाल जाहीर.
स्फोट घडवण्यामागे मुस्लिम समाजात भीती पसरवून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा कट -एनआयएचे आरोप.
संपूर्ण गटाचा स्फोटात प्रत्यक्ष सहभाग असल्याचं पुराव्यानिशी स्पष्ट होत असल्याचं एनआयएचं म्हणणं.
तपासाची सुरुवात एटीएस ने केली; 2022 मध्ये एनआयएकडे हस्तांतरण.
7 आरोपींवर आरोप निश्चित केल्यानंतर 2018 साली प्रत्यक्ष सुनावलीला सुरूवात.
आरोपींवर युएपीए कायद्याच्या दहशतवादी कृती आणि कट रचण्याचे आरोप. यासह भारतीय दंड संहितेच्या हत्या, हत्येचा प्रयत्न, धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप.
सुरूवातीला सरकारी पक्षानं 323 साक्षीदार तपासले, त्यातील 37 फितूर झाले.
स्फोटक ठेवलेली दुचाकी साध्वी प्रज्ञाची होती, असा एटीएसचा दावा.
23 ऑक्टोबर 2008 साली साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला अटक. त्यानंतर 14 नोव्हेंबरपर्यंत 11 जणांना बेड्या.
या प्रकरणी एटीएसनं मकोका लावला होता. पण नंतर ते मागे घेण्यात आले.
2008 च्या सुरुवातीलाच कट रचला गेला, फरीदाबाद, भोपाळ, नाशिक येथे बैठक. एटीएसचा दावा.
बॉम्ब चतुर्वेदीच्या घरी बनवण्यात आला, नंतर दुचाकीवर बसवण्यात आले.
रामजी कालसंग्रा, संदीप डांगे – फरार.
प्रज्ञा ठाकूर यांच्या मालकीची दुचाकी रामजी कालसंग्राच्या ताब्यात होती, असा एनआयएचा दावा.
’या प्रकरणात मला गोवण्यात येत आहे.’- साध्वी प्रज्ञात सिंह ठाकूर यांचा दावा.
’आपल्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही’ – कर्नल पुरोहित.
मकोका हटवल्यानंतर, मकोका अंतर्गत घेतलेल्या जबाबांची किंमत शुन्य.
एटीएसच्या तपासात दोष असल्याचा दावा. एनआयएने नव्यानं काही जबाब नोंदवले. काही साक्षीदारांनी साक्ष बदलली.
एनआयएने एकदा प्रज्ञा यांना आरोपींची यादीतून वगळण्याची मागणी केली होती, पण विशेष न्यायालयाने नाकारले.
गुरुवार दि. 31 जुलै मालेगाव स्फोटप्रकरणी न्यायालयाने निकाल दिला.
उशीरा का होईना, न्याय मिळाला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदे
न्यायालयाच्या निकालाचे स्वागत सगळ्यांनी केलं आहे. पण न्याय मिळायला उशीर झालाय. देर आए, दुरुस्त आए. उशीरा का होईना, न्याय मिळाला आहे. तेव्हा देशात यूपीएचं सरकार होतं. देशात मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट होत होते. तेव्हा यूपीए सरकारचं म्हणणं होतं की दहशतवादाला कुठलाही रंग नसतो. पण मालेगाव बॉम्बस्फोट झाल्यावर सरकारने म्हटलं की हा भगवा दहशतवाद आहे. त्यात राजकारणाचा प्रयत्न केला. पण या प्रकरणाच्या राजकीयिकरणाला न्यायालयाने निकालातून चपराक दिली आहे. भगवा दहशतवाद म्हणून हिंदुत्वाला या बॉम्बस्फोटाशी जोडलं गेलं. जे घडलं ते दुर्दैवी आहे. आम्ही कोणत्याही दहशतवादाचं समर्थन करत नाही, करणारही नाही. न्यायव्यवस्थेवर आमता विश्वास आहे. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांनी दिली आहे.
12 जणांवर आरोप, मात्र सात जणांवरच खटला
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (माजी खासदार, भाजप), लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी (उर्फ स्वामी अमृतानंद देवतीर्थ), समीर कुलकण, सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर खटला चालला. रामचंद्र कालसंग्रा, शामजी साहू, संदीप डांगे, प्रवीण तकलकी आणि राकेश धावडे हे पाच जण फरार आहेत. साध्वी प्रज्ञा यांना 2017 मध्ये, तर कर्नल पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाने राजकीय कुरघोडीचा बळी ठरल्याचे नमूद करत जामीन दिला होता.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल (31 जुलै) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला. न्यायालयाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या ’एक्स’ अकाऊंटवर दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार’, असे म्हटले आहे.
30 साक्षीदारांचा मृत्यू, 34 फितूर
देशातील दहशतवादाशी संबंधित दीर्घकाळ चाललेल्या खटल्यांपैकी हा एक खटला आहे. विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह आणि पुरोहित यांच्यासह प्रकरणातील शकत आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड विधान आणि शस्त्रास्त्र कायदा अशा महत्त्वाच्या कायद्यांतंर्गत दहशतवादाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवला. खटल्यात एनआयएतर्फे 323 साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्यात आले, तर आरोपपत्रात उल्लेख असलेल्या जवळपास 30 हून अधिक साक्षीदारांची साक्ष देण्यापूवच मृत्यू झाला. याशिवाय, त्यापैकी 34 साक्षीदार फितूर झाले. हे साक्षीदार पुरोहित आणि कथित कट रचण्याच्या बैठकांशी संबंधित होते. तथापि, बॉम्बस्फोटांचा कट रचण्याबद्दल आरोपींनी केलेल्या कोणत्याही चर्चेत आपण सहभागी झाल्याचे किंवा ही चर्चा ऐकल्याचे या साक्षीदारांनी नाकारले. प्रकरणाचा सुरुवातीचा तपास करणाऱ्या राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जबरदस्तीने, बेकायदेशीररित्या आपल्याला ताब्यात घेतले आणि काही व्यक्तींची नावे सांगण्यास, खोटे विधान करण्यास धमकावल्याचा आरोपही या साक्षीदारांनी साक्ष नोंदवताना केला होता.
कोणा कोणाला आरोपी ठरवले होते?
प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी
रामजी कालसंग्रा –फरार, शामजी साहू – फरार, संदीप डांगे–फरार, प्रविण तकलकी – फरार, राकेश धावडे – फरार
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू आतंकवादाचा, भगव्या आतंकवादाचा नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, निवडणुकीत अल्पसंख्याकांचे लांगून चालन करण्यासाठी हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे, अशा प्रकारचा प्रचार केला होता, तो प्रचार किती खोटा होता हे आज उघड झालं आहे. ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र, तो प्रयत्न किती खोटा होता हे न्यायालयाने पुराव्यानिशी सांगितलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “खरं म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारणी ज्यांच्यावर यूपीए सरकारने कारवाई केली होती त्यांची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. तसेच संपूर्ण हिंदू समाजाची देखील काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. ज्या प्रकारे भगवा आतंकवाद दाखवून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेसने जाहीर माफी मागावी”, असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
मला १३ दिवस टॉर्चर करण्यात आलं होतं; कोर्टातच रडल्या साध्वी प्रज्ञासिंह
मालेगावमध्ये १७ वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दाखल खटल्याचा गुरुवारी (३१ जुलै) निकाल लागला. एनआयएच्या विशेष न्यायालयानं सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात भोपाळमधील भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना मुख्य आरोपी करण्यात आलं होतं. या प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर प्रज्ञासिंह यांना रडू कोसळलं. हा भगव्याचा विजय आहे. मला १३ दिवस टॉर्चर करण्यात आलं होतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. महाराष्ट्रातील मालेगाव २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोटानं हादरलं होतं. या प्रकरणात साध्वी प्रज्ञा यांना मुख्य आरोपी करण्यात आलं होतं. एनआयएच्या विशेष न्यायालयानं या प्रकरणी आज निकाल सुनावला. अनेक आरोप सिद्ध करण्यात एनआयए अपयशी ठरली. दहशतवादाचा कोणताही रंग किंवा धर्म नसतो, असं न्यायालयानं निकाल देताना नमूद केलं.
हा भगव्याचा विजय
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा या कोर्टातच रडल्या. मला १३ दिवस टॉर्चर करण्यात आलं होतं. मी खूप अपमान सहन केला. संन्याशाचं आयुष्य जगत होते. आम्हाला दहशतवादी ठरवण्यात आलं. ज्या लोकांनी आमच्यासोबत चुकीचं केलं, त्यांच्याबद्दलही बोलू शकत नाही. १७ वर्षांपासून लढा देत आहे. भगव्याला कलंकित करण्यात आलं, अशी प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञा यांनी दिली. साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, या निकालानं मला आनंद झालाय. आमचं दुःख, वेदना समजून घेतल्या. हा खटला आम्ही नाही तर भगव्यानं जिंकला आहे. हिंदुत्वाचा विजय झाला आहे. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. ज्या लोकांनी हिंदू दहशतवाद म्हटलं, भगवा दहशतवाद म्हटलं त्यांना शिक्षा होईल.’
कोणतेही पुरावे सापडले नाही…; कोर्टाची निरीक्षणे काय?
कोर्टात सरकारी पक्षानं बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सिद्ध केलं. पण स्कूटीमध्ये झाला, हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आलं. तपास प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. पंचनामे योग्य पद्धतीने झालेले नव्हते, आरोपींचे हातांचे ठसे जप्त करण्यात आले नव्हते, असे निरिक्षण न्यायालयानं नोंदवले. दुचाकीचा चेसीस नंबर कधी रिकव्हर करण्यात आला नाही. तसेच, स्फोटासाठी वापरलेली दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मालकीची असल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं. न्यायालयाने तपास यंत्रणांच्या बैठकांबाबतच्या दाव्यांवर समाधान व्यक्त केलं नाही. याशिवाय, सुरुवातीला लावलेला मकोका कायदा मागे घेण्यात आल्यामुळे त्या अंतर्गत नोंदवलेले जबाब अमान्य ठरले. UAPA (अनलॉफुल अॅक्टिविटीज प्रिवेन्शन अॅक्ट) साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे. त्यामुळे UAPA अंतर्गत कारवाई ग्राह्य धरली गेली नाही. लष्करी अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी घेतलेली मंजुरीही न्यायालयाच्या दृष्टिकोनातून संशयास्पद ठरली. तसेच आरडीएक्स कर्नल पुरोहितांनी आणल्याचा कोणताही पुरावा नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं. न्यायालयाने नमूद केलं की, सर्व आरोपींना “बेनिफिट ऑफ डाऊट” दिला जात आहे. फक्त संशयाच्या आधारावर त्यांना दोषी ठरवले जाऊ शकत नाही. त्यामुळे सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.
कोणत्या पाच मुद्द्यांवरुन निर्दोष सुटका?
– लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी काश्मीरमधून आरडीएक्स आणले आणि घरी बॉम्ब तयार केला, याचे कुठलेही पुरावे आढळले नाहीत.
– साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडे त्या बाईकचा ताबा त्यावेळी होता, हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आलं नाही.
– स्फोट झालेला बॉम्ब त्या बाईकमध्येच लावलेला होता, असं कोर्टात निर्विवादपणे सिद्ध होऊ शकलेलं नाही.
– बॉम्ब स्फोट घडवण्यासाठी बैठका झाल्या, हा मुद्दाही सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेलं नाही.
– आरोपींच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत, संशयाच्या आधारावर त्यांना दोषी ठरवता येणार नाही
दहशतवाद्याला रंग नसतो
दरम्यान, विशेष एनआयए न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी यावेळी दहशतवादाचा कुठलाही धर्म नाही, कुठलाही रंग नाही, अशी टिप्पणी केली. विशेष म्हणजे मालेगाव स्फोटापासून दहशतवादाच्या रंगावरून सातत्याने वार पलटवार होत राहिला आहे. दुसरीकडे, एनआयए न्यायालयाने म्हटले की, मालेगावमध्ये स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केलं, पण बाईकमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सिद्ध करण्यात अपयशी ठरले. जखमींची संख्या 101 नाही तर 95 होती. काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोपही न्यायालयात केला असून त्याच्या सखो चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मालेगाव बॉम्बस्फोट ; इम्तियाज जलील यांचं मोठं विधान
2008 मध्ये मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉम्बस्फोट निकालावर एमआयएमचे नेते आणि सांभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर महाराष्ट्र सरकार काय पावले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, तर ज्याप्रकारे मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरण पुनरावलोकनासाठी पाठवले गेले, त्याचप्रमाणे मालेगाव प्रकरणही सुप्रीम कोर्टाकडे पाठवण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला द्यावेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात खऱ्या अर्थाने न्याय मिळवायचा असेल, तर जात, धर्म आणि राजकारण बाजूला ठेवून विशेष एनआयए न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागितली पाहिजे.”
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या बाईकबाबत न्यायालयाने काय म्हटलं?
बॉम्बस्फोट झाला हे कोर्टाने मान्य केले मात्र बाईकवरच बॉम्बस्फोट झाला की नाही हे सिद्ध होऊ शकले नाही. तसंच, ती बाईक कोणाची होती, हेदेखील सिद्ध होऊ शकले नाही. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावाने असलेल्या चेसिस नंबर नीट आढळला नव्हता. नंबरप्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक असतो. साध्वीच्या नावाने असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट नव्हता, त्यामुळं ती बाईक साध्वीचीच होती, हे सिद्ध करणारे ठोस पुरावे सरकारी पक्षाला सादर करता आले नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
निर्दोष मुक्ततेनंतर प्रसाद पुरोहित यांची प्रतिक्रिया
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्त झालेल्यांपैकी ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी प्रतिक्रिया दिली आहे “या देशाने मला सेवा करण्याची संधी यापूर्वीही दिली, जामिनावर सुटल्यावरही दिला आणि यानंतरही मला संधी देत आहे याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. एक निर्दोष ठरल्यावर माझी इच्छा आहे की परमेश्वर आणि मातृभूमीने ही संधी प्रत्येकाला द्यावी आणि ते देत असतात.पण कमतरता आपल्यात असते की आपण त्याचा फायदा घेत नाहीत. त्यामेळे देशाचे काम कार, देश सोडून दुसरं काही नाही, अशा प्रतिक्रया निवृत्त कर्नल पुरोहित यांनी दिली,” असे ते म्हणाले.