Crime News: उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात रात्री कुख्यात गुंडांचा एन्काऊंटर झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या एसटीएफच्या मेरठ पथकाने शामलीच्या झिंझाना हद्दीत सोमवारी रात्री २.३० वाजता मुस्तफा गँगच्या गुंडांना घेरलं. त्यानंतर झालेल्या चकमकीत ४ गुंड मारले गेले. यावेळी एसटीएफचे इन्स्पेक्टर सुनील कुमार जखमी झाले. सध्या सुनील कुमार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एसटीएफ मेरठच्या पथकाने शामलीच्या झिंझाना हद्दीत मुस्तफा कग्गा गँगचा सदस्य अरशद आणि त्याच्या तीन साथीदारांना घेरलं. तिन्ही कुख्यात गुंड एका कारमध्ये होते. यावेळी अशरद आणि त्याच्या साथीदारांनी एसटीएफच्या पथकावर गोळीबार केला. एसटीएफच्या पथकाने प्रत्युत्तरात गोळीबार केला. या गोळीबारात ४ कुख्यात गुंड मारले गेल्याची माहिती पोलीस अधिकारी ब्रिजेश कुमार यांनी दिली. मध्यरात्री २.३० वाजता हा चकमकीचा संपूर्ण थरार घडला.
मध्यरात्री झालेल्या चकमकीत एसटीएफचे इन्स्पेक्टर सुनील कुमार हे देखील गंभीर जखमी झाले. तर पोलिसांनी ४ गुंडांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी ४ गुंडांना मृत घोषित केले. मृत गुंडावर एक लाखांचं बक्षीस ठेवलं होतं. अरशद आणि त्याचे ३ साथीदार मंजीत, सतीश आणि एक अज्ञात म्हणून ओळख झाली आहे. अरशदवर लूटमार, दरोडा आणि हत्या करण्याचे डझनभर गुन्हे नोंद आहेत.
इन्स्पेक्टर सुनील यांना जखमी झाल्यावर अमृतधारा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात पाठवण्यात आलं. या चकमकीची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून देशी कट्ट्यासहित इतर साहित्य जप्त केले आहे.