मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणाने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार वादळ निर्माण केले आहे. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी बुधवारी (१६ जुलै) विधानसभेत गंभीर आरोप करत सांगितले की, राज्यातील मोठे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत.
गुरुवारी (१७ जुलै २०२५) झिरो अवर दरम्यान त्यांनी सभागृहात पेन ड्राइव्ह दाखवत, “माझ्याकडे पुरावे आहेत, सरकारला हवे असल्यास मी हे सभागृहात दाखवू शकतो,” असा इशारा दिला. या प्रकरणाने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली असून, सरकारवर तातडीने खुलासा करण्याचा दबाव वाढला आहे.
नाना पटोलेंचे गंभीर आरोप
नाना पटोले यांनी विधानसभेत सांगितले की, मुंबई मंत्रालय, ठाणे आणि नाशिक हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहेत. “हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्याची गोपनीय कागदपत्रे असामाजिक तत्त्वांच्या हाती लागली आहेत. यामुळे राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे,” असे पटोले यांनी ठणकावले. त्यांनी पुढे म्हटले, “मला कोणाचे चरित्रहनन करायचे नाही, पण सरकार या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने याबाबत निवेदन द्यावे, अन्यथा विरोधक आंदोलन तीव्र करतील.” त्यांनी सभापतींकडे याबाबत सरकारला निर्देश देण्याची मागणी केली.
72 अधिकारी आणि मंत्र्यांचा सहभाग?
पटोले यांनी बुधवारी केलेल्या दाव्यात सांगितले की, 72 ते 75 वरिष्ठ अधिकारी, आयएएस, आयपीएस, आणि काही माजी व विद्यमान मंत्र्यांचा या हनी ट्रॅप प्रकरणात समावेश आहे. नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या घोटाळ्याचे धागेदोरे जोडले गेले असून, एका महिलेने खोटे बलात्काराचे आरोप आणि ब्लॅकमेलिंगद्वारे कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ठाणे, मुंबई, पुणे आणि नाशिकमधील अधिकारी अडकल्याचे वृत्त आहे.
पेन ड्राइव्हचा दावा आणि सभागृहात गदारोळ
गुरुवारी पटोले यांनी सभागृहात पेन ड्राइव्ह दाखवत सरकारला खुलासा करण्याचे आव्हान दिले. “माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. सरकारला हवे असल्यास मी हे सभागृहात दाखवायला तयार आहे,” असे त्यांनी ठणकावले. यामुळे सभागृहात एकच गदारोळ उडाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. जाधव म्हणाले, “गृहराज्यमंत्र्यांनी मीडियासमोर दावा केला की, नाशिकमधील तक्रार मागे घेण्यात आली आहे. मग ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती का? याबाबत स्पष्टता हवी.”
गृहराज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, ठाण्यात एका अधिकाऱ्याविरोधात हनी ट्रॅपची तक्रार नोंदवली गेली होती, परंतु ती परस्पर संमतीने मागे घेण्यात आली. “या प्रकरणात कोणतीही अधिकृत तक्रार सध्या पोलिसांकडे नाही. नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाबाबत कोणताही ठोस पुरावा नाही,” असे कदम यांनी स्पष्ट केले. तथापि, त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही नमूद केले.