अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, आक्रमक नेते किरण काळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेते प्रवेश होणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर शनिवारी रात्री काळे आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
प्रवेशाला रवाना होण्यापूर्वी काळे यांनी कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले. हिंदू धर्मरक्षक स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या शिवालय येथील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत नतमस्तक होत अभिवादन केले. यावेळी कोण आला रे, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अमर रहे अमर रहे, स्व. अनिलभैय्या अमर रहे, किरणभाऊ काळे आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, ज्येष्ठ शिवसैनिक रेवजी नांगरे, डॉ. श्रीकांत चेमटे, मनोज चौहान, किरण बोरुडे, दिलदार सिंग बीर, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास शिंदे सर, जेम्स अल्हाट, विलास उबाळे आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, शंकर आव्हाड, किशोर कोतकर, सुरज ठोकळ आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक हे देखील काळे यांच्या समवेत मुंबईकडे रवाना झाले आहेत.
शिवसेनेत आउटगोइंग नंतर पुन्हा मोठे इन्कमिंग
दरम्यान, शहर शिवसेना उबाठा पक्षाच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत काही दिवसांपूर्वी प्रवेश केल्यामुळे शहर शिवसेनेत आउटगोइंग झाले होते. मात्र किरण काळे हे ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांसह रविवारी दुपारी प्रवेश करणार असल्यामुळे शिवसेना उबाठात मोठे इन्कमिंग झाले आहे. त्यामुळे शिवसेना उबाठामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.