कोल्हापूर / नगर सह्याद्री :
कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू होणार आहे. परीक्षा संपल्या असून मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. यामुळे अनेक जण सुट्ट्यांमध्ये विविध देवस्थानांना भेटी देतात. तसेच ऐरवी देखील अनेक जण देव दर्शनासाठी जात असतात. मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्यापासून कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलीये. त्यामध्येच आता मंदिरात जाण्यासाठी ड्रेस कोड लागू केला जाणार आहे.
अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंदिर परिसरात येताना पारंपारिक कपडे किंवा पूर्ण अंग झाकले जाईल असेच कपडे घालून यावे लागणार आहे. शॉर्ट कपडे आता मंदिरात चालणार नाहीत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उद्यापासून ड्रेस कोडच्या नियमाचे पालक करावे लागणार आहे.
महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी भाविकांना याबाबत आवाहन केले आहे. तोकडे कपडे घालून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीकडून सोवळयाची देखील आता व्यवस्था केली जाणार आहे. सचिव शिवराज नाईकवाडे यांनी याबाबत ही माहिती दिली आहे. आजच्या दिवस मंदिरात येणाऱ्या भाविकांना याबद्दलची सूट ही देण्यात आलीये. मात्र, उद्यापासून या नियमाचे कडक पालन हे करावे लागणार आहे.
राज्यातील अनेक देवस्थानांनी घेतला असाच निर्णय
कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरातच अशाप्रकारचा नियम तयार करण्यात आला असे नाहीये. यापूर्वीही राज्यातील अनेक देवस्थानांनी अशाप्रकारचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अष्टविनायक गणपतीसह ५ मंदिरांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून ५ मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. चिंचवड देवसस्थानकडून यापूर्वी यासंबंधित पत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आली होती. विविध देवस्थान ट्रस्टकडून कपड्यांबाबत नियमावली लागू करण्यात आली आहे.