अहिल्यानगर । नगर सहयाद्री
श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल ५०० कोटी रुपयांच्या नोकरभरती घोटाळा, आर्थिक अनियमितता आणि बनावट दर्शन अॅपद्वारे भाविकांची फसवणूक या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेत, देवस्थानवचे ट्रस्ट बरखास्त केले आहे. या निर्णयानुसार ट्रस्टचा पूर्ण कारभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. यासंदर्भातील शासकीय आदेश नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
राज्य सरकारने शनैश्वर देवस्थानच्या ट्रस्ट व्यवस्थापनाची जबाबदारी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवली आहे. जिल्हाधिकारी हे विश्वस्त व्यवस्थेचे प्रशासक म्हणून काम पाहतील. ही नियुक्ती विश्वस्त व्यवस्थापन समिती स्थापन होईपर्यंत तात्पुरती असणार आहे. या निर्णयामुळे सध्या चर्चेत असलेल्या घोटाळ्याची चौकशी अधिक पारदर्शक आणि परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काही आठवड्यांपूर्वी देवस्थानमध्ये नोकर भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. त्यासोबतच, श्री शनैश्वर दर्शनासाठी बनावट मोबाइल अॅप्सद्वारे हजारो भाविकांची फसवणूक झाल्याचा आरोपही झाला होता. या प्रकरणावरून राज्य विधीमंडळातही प्रखर चर्चा झाली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर आता सायबर पोलिसांकडून या बनावट अॅप घोटाळ्याची चौकशी सुरू आहे.
आतापर्यंत पाच बनावट अॅपच्या लिंक्स सापडल्या असून, संबंधित चालक, मालक व अन्य आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ४ जून रोजी देवस्थानचे मुख्य सुरक्षा अधिकारी आणि इतर दोन व्यक्तींनी अहिल्यानगर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारींवर प्राथमिक चौकशी करताना पोलिसांना फसवणुकीचे स्पष्ट पुरावे मिळाले. त्यानंतर संबंधित आरोपींविरुद्ध सायबर गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.