मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र सरकारने ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने शिक्षण शुल्क व परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठी वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा रद्द केली आहे. त्याऐवजी आता विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी: ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठी वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा होती. त्यामुळे ८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यांना पूर्ण शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क भरावे लागत होते. त्यामुळेच उत्पन्नाची अट रद्द करण्याची मागणी केली जात होती, त्याऐवजी नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरावे, अशी मागणी होत होती. त्यानुसार आता हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात बहुजन कल्याण विभागाने काढलेल्या पत्रकानुसार, ओबीसींची आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा रद्द करून नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र आहे, त्यांना शिक्षण शुल्क तसेच परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू होईल. ज्या ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी पालकांचे उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे; पण त्यांच्याकडे नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र आहे, अशा विद्यार्थ्यांना ५० टक्के तर विद्यार्थिनींना १०० टक्के शिक्षणशुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत फायदा होणार आहे.