मुंबई । नगर सहयाद्री
राज्य सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जमिनीच्या हिस्सेवाटप प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मोजणी शुल्कात मोठी कपात केली आहे. आता केवळ २०० रुपयांमध्ये जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार असून शेतीची, जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप कमी खर्चात होणार आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता अवघ्या २०० रुपयांमध्ये जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे. राज्य सरकारने मोजणी शुल्कात मोठी कपात केली असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. फक्त २०० रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
हिस्सेवाटप प्रक्रियेत अनेक वेळा एकत्र कुटुंबातील सदस्यांना आपापला हिस्सा स्पष्ट करून घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये धावपळ करावी लागते. यासाठी मोजणी हवी असते आणि याआधी त्यासाठी प्रति हिस्सा १००० ते ४००० रुपये शुल्क आकारले जात होते. ही रक्कम आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा बोजा ठरत होती. आता केवळ २०० रुपये भरून शेतकऱ्यांना नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे मिळणार आहेत.
यामागील उद्देश काय?
राज्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा यामागील उद्देश आहे. बऱ्याचशा भागांमध्ये शेती ही एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे. हिस्सेवाटपाच्या प्रक्रियेसाठी भरावा लागणारा जास्तीचा मोजणी शुल्क हा अनेक कुटुंबांमध्ये तणावाचा विषय ठरत होता. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने मोजणी शुल्क फक्त 200 रुपये इतके मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
जमीन मोजणीचे प्रकार किती?
साधी मोजणी : साधी जमीनीची मोजणी करण्यासाठी साधारण सहा महिने लागतात. यासाठी सरकारला 1000 रुपये जमीन मोजणी शुल्क भरावे लागतात. तातडीची मोजणी: आपल्या जमिनीची मोजणी तातडीने करण्यासाठी ही तीन महिन्यांची असलेली जमीन मोजणीची प्रक्रीया आहे. यासाठी जमीन मालकाला किंवा शेतकऱ्याला सरकारला 2000 रुपयांचे मोजणी शुल्क भरावे लागते. अतितातडीची मोजणी : यात दोन महिन्यांच्या कालावधीत जमीनीची मोजणी केली जाते. यासाठीचे मोजणी शुल्क 3000 रुपये आहे.