१२ जिल्ह्यांतील ३५ जागांवरील मतदान रद्द; न्यायालयातील सुनावणी न झाल्याने कारवाई स्थगित
मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत १२ जिल्ह्यांतील ३५ जागांवरील २ डिसेंबरचे मतदान तूर्तास रद्द केले आहे. संबंधित जागांवरील उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप निकाल न लागल्याने आयोगाने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
अर्ज छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांविरोधात अनेक उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. मात्र या याचिकांवर न्यायालयाने कोणताही आदेश न दिल्याने उमेदवारांना चिन्हांचे वाटप शक्य झाले नाही. परिणामी पुढील प्रक्रिया ठप्प झाल्याने आयोगाने मतदान पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहे. आयोगाच्या माहितीनुसार, संभाजीनगर, अमरावती, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, जालना, लातूर, पुणे, परभणी, सोलापूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील ३५ जागांवरचे मतदान अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने ओबीसींना २७ टक्के सरसकट आरक्षण दिल्याने काही ठिकाणी आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. यासंदर्भात दाखल याचिकांवर आज दुपारी सुनावणी होणार असून, निवडणुका वेळेवर होतील की स्थगित होतील, याबाबत सर्वोच्च न्यायालय महत्त्वाचा निर्णय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



