IAS Pooja Khedkar News: UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज, 21 एप्रिल रोजी सुनावणी झाली. या सुनावणीत अनेक महत्त्वाचे युक्तिवाद झाले असून, न्यायालयाने अटकेपासून सशर्त संरक्षण कायम ठेवले आहे.
न्यायालयाने स्पष्ट केलं की, जोपर्यंत पूजा खेडकर चौकशीत सहकार्य करते, तोपर्यंत तिला अटक करता येणार नाही. दिल्ली पोलिसांकडून पूजाच्या कोठडीत चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र, पूजा खेडकरच्या वकिलांनी या मागणीला विरोध करत सांगितलं की, “पूजा चौकशीत पूर्णपणे सहकार्य करत आहे, त्यामुळे कोठडीत चौकशीची गरज नाही. याच वेळी, न्यायालयाने “तपास अद्याप ठोसपणे सुरू झालेला नाही” अशी महत्त्वपूर्ण टिप्पणीही केली. कोर्टाने निर्देश दिले की 2 मे रोजी सकाळी 10.30 वाजता पूजाने क्राईम ब्रँच समोर हजर राहावं.
काय आहे पूजा खेडकर प्रकरण?
पूजा खेडकर यांच्यावर आरोप आहे की त्यांनी UPSC परीक्षेत OBC आणि अपंगत्व आरक्षणाचा गैरवापर करत जास्त प्रयत्न (अटेंम्प्ट) मिळवले आणि काही कागदपत्रांमध्ये फेरफार केला. दिल्ली उच्च न्यायालयाने 23 डिसेंबर 2024 रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. न्यायालयाने प्रथमदर्शनी “मोठा कट” असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. यासंदर्भात UPSC ने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली असून, भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांपासून त्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, पूजाने सर्व आरोप फेटाळले आहेत.
दरम्यान आता पूजा खेडकरला आता 2 मे रोजी चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, 21 मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत ती चौकशीत सहकार्य करत राहिली, तर अटकेपासून संरक्षण कायम असेल.