मुंबई | नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रात परतीच्या मान्सूनने पुन्हा एकदा सक्रिय होत राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढवला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कुठे, कधी आणि किती पाऊस?
१५ ऑक्टोबर:
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, नगर, संभाजीनगर, अकोला, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर – वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट.
१६ ऑक्टोबर:
रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, नाशिक, नगर, धुळे, जळगाव, बीड, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली – मुसळधार पावसाचा इशारा.
१७ ऑक्टोबर:
पालघर, नाशिक जिल्ह्यात यलो अलर्ट, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व तळकोकणात हलक्या पावसाची शक्यता. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मान्सून माघारीच्या प्रवासात काय स्थिती आहे?
हवामान विभागानुसार, देशभरात नैऋत्य मान्सून परतीच्या टप्प्यात असून, महाराष्ट्र, गोवा, एम.पी., यूपी, बिहार, झारखंड आणि छत्तीसगडमधून मान्सून परतला आहे. सध्या परतीचा मान्सून कर्नाटक, तेलंगणा, प. बंगाल व ईशान्य भारतात सक्रिय आहे. देशाच्या सुमारे ८५ टक्के भागातून मान्सून परतलेला असून, पुढील दोन दिवसांत तो संपूर्ण देशातून माघारी फिरण्याची शक्यता आहे.
तापमानात बदल?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ४–५ दिवस कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर किमान तापमानात २–३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
नागरिकांना इशारा
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. वादळी वाऱ्यांमुळे झाडे, वीजवाहिन्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.