मुंबई । नगर सहयाद्री:-
लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, आता एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. याआधी काही कुटुंबांतील तीन ते चार महिलांनी लाभ घेतल्याचे आढळून आल्यानंतर सरकारने अर्जांची पुनर्पडताळणी सुरू केली आहे. त्यानुसार, अटींचा भंग करणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत.
महत्वाचे म्हणजे, योजनेच्या अटींच्या विरोधात जाऊन अनेक महिलांनी आधारकार्डवरील जन्मतारीख बदलून, वेगवेगळी रेशनकार्डं दाखवून किंवा उत्पन्नाची खोटी माहिती देऊन लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अशा महिलांच्या अर्जांवर एफएससी मल्टिपल इन फॅमिली असा शेरा देऊन लाभ थांबवण्यात येत आहे. याचसोबत अनेक महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्या महिलांच्याही अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. आतापर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, याबाबतची माहिती प्राप्तिकर विभाग महिला व बालविकास विभागाला देईल. त्याआधारे पडताळणी केली जाईल. लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेल्या महिला संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करत असल्याचेही सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी पर्याय दिला आहे. दरम्यान, अनेक महिलांना दर महिन्याला लाभ मिळत होता. परंतु हा लाभ अचानक बंद झाल्याने महिलांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामध्ये एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील त्यांचा समावेश आहे.