पारनेर / नगर सह्याद्री-
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आयोजित बैठकीत शेतकरी नेते अनिल देठे यांनी जाहीरपणे पक्ष प्रवेश केला. नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे देठे यांनी नाराजीमुळे पूर्वीच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काम करणारे अनिल देठे हे तालुका व जिल्ह्यात शेतकरी हितासाठी सक्रिय राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान पारनेर तालुक्यातील पठार भागातील किनी, करंडी, भैरोबा वाडी या परिसरातून निलेश लंके यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. शेतकरी चळवळीमधून त्यांनी युवक व शेतकरी संघटनांमध्ये मजबूत नेटवर्क तयार केले आहे.
आमदार काशिनाथ दाते यांच्या संयमी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांच्यासह संदीप कपाळे, विजय औटी, भास्कर उचाळे, प्रशांत गायकवाड, सुषमा रावडे, अपर्णा खामकर, सुधामती कवाद आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अनिल देठे यांच्या प्रवेशामुळे खासदार निलेश लंके यांच्या गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. विशेषतः पठार भागात त्यांची पकड घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अजित पवार गटाची ताकद वाढणार असून अनिल देठे हे इच्छुकांच्या यादीत असणार आहेत. समाज माध्यमांवर त्यांनी पंचायत समितीसाठी इच्छुक असल्याचे आधीच जाहीर केले आहे.