नाशिक / नगर सह्याद्री :
येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला मोठा धक्का बसला आहे. युवा सेना तालुका उपाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे सादर करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्ष नेतृत्वाने निवडणूक प्रक्रियेत स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केला, तसेच पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून ऐनवेळी पक्ष प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिल्याने नाराजीतून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या इच्छुकांना तिकीट न देता बाहेरून आलेल्यांना प्राधान्य देणे, तसेच काही वरिष्ठ नेत्यांनी स्वार्थाचे राजकारण केल्याचा आरोपही शहरातील पदाधिकाऱ्यांनी केला. “आम्ही दोन वर्षांपासून पक्ष उभारत आहोत, मात्र आमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करून आमच्या मतांची तमा न बाळगता निर्णय घेतले गेले, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राजीनामा दिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश केला आहे. नव्या पक्षात सामील झालेल्या इच्छुकांना उमेदवारी देखील देण्यात आल्याची माहिती मिळते.
इगतपुरीतील राजकीय समीकरणांना नव्या वळण देणारी ही घटना आगामी निवडणुकीत कोणते परिणाम घडवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजताच विरोधी पक्षाला खिंडार लागल्याचे चित्र होते. मात्र आता निवडणुकीच्या अर्ज भरायचा आजचा शेवटचा दिवस असल्याने रविवारी अनेक शिंदेंच्या शिवसनेच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यात एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.



