Maharashtra Politics News: राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून रविवारी ते भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागलीये. थोपटेच्या या निर्णयानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच काँग्रेसलाही धक्का बसलाय.
संग्राम थोपटे हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. तीन वेळा ते भोरमधून काँग्रेसचे आमदार राहिले. वडील अनंतराव थोपटे ६ वेळा भोरमधून काँग्रेस आमदार राहिले होते. ते राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देखील आहेत. विधानसभा निवडणूकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांचा पराभव झाला होता. भोरचे थोपटे कुटुंबीय आणि बारामतीचे पवार कुटुंबीय यांचा जुना राजकीय वाद होता.
मात्र यावेळी लोकसभेला बारामतीमधून सुप्रिया सुळेंना घरातून सुनेत्रा पवारांचे आव्हान आल्यानं शरद पवारांनी 40 वर्षांपासून असलेल्या राजकीय वैराला मुठमाती दिली. थोपटेंच्या घरी जाऊन त्यांनी नवी राजकीय समीकरणं जुळवून आणली.परिणामी सुप्रिया सुळेंना भोरमधून मोठं मताधिक्य मिळालं. त्यामुळे थोपटेंचं भोरमधील वर्चस्व कायम होतं. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊन एकाच वेळी शरद पवार आणि काँग्रेसला धोबीपछाड देण्यास भाजप यशस्वी झाल्याची चर्चा आहे.