Political News: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं तब्बल 232 जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यानंतर आता महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे, महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटानंतर आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसचे १० माजी नगरसेवक आज मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये माजी आ. स्व. जयंत ससाणे यांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक अशिष धनवटे, शशांक रासकर, शामलिंग शिंदे, कैलास दुबय्या, मनोज लबडे, राजेंद्र आदिक, संजय गांगड, सोमनाथ गांगड यांचा समावेश आहे. या प्रवेशामुळे राजकारणातील ‘किंगमेकर’ म्हणून ओळख असलेल्या विखे यांनी माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे गटाला मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.
आगामी काळात अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपाची ताकद अधिक वाढविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार ‘बॅटींग’ सुरु केली आहे. श्रीरामपुरातील काँग्रेसचा एक मोठा गट फोडण्यात विखेंना यश आले आहे. मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आज (मंगळवारी) दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत श्रीरापुरातील काँग्रेसचे (ससाणे गट) १० प्रमुख स्थानिक नेते भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत.