मुंबई । नगर सहयाद्री:-
महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात बंदची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंदमध्ये सहभागी होण्याचे जनतेला आवाहन केले आहे.
जागा वाटपाची चर्चा रद्द महाविकास आघाडीची नुकतीच बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत चर्चा होणार होती. पण राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा मुद्दा मांडत जागा वाटपाची चर्चा रद्द करण्यात आली आणि शनिवारी 24 ऑगस्ट रोजी राज्यात बंदची हाक देण्यात आली.या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
सणाचे दिवस आहेत. त्यामुळे शनिवारी होणारा महाराष्ट्र बंद हा दुपारी २ वाजेपर्यंत करावा, असे ठाकरेंनी सांगितले. घरापर्यंत विकृती येऊ नये म्हणून जनतेने जागे व्हावे. एकात्मतेचे विराट दर्शन दाखवावे. बदलापूरमध्ये झालेल्या दुष्कृत्याचा निषेध करण्यासाठी २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीने जाहीर केला आहे. हा बंद राजकीय नसून विकृतीचा निषेध आणि बंदोबस्त करण्यासाठी आहे.
मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे; त्या प्रत्येकाने हा बंद पाळला पाहिजे. नराधमांना धडा शिकवला पाहिजे. ‘महाराष्ट्र बंद’ हा विकृतांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आहे.शनिवारचा महाराष्ट्र बंद हा संकृती विरुद्ध विकृती असा आहे. मुंबईतील लोकल, बेस्ट बससेवा बंद ठेवाव्यात, अशी विनंती वजा सूचना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केली आहे. कडकडीत बंद असायला हवा. रुग्णवाहिका, वृत्तपत्र सुरू राहतील, असे ठाकरे यांनी सांगितले.