अहिल्यानगर । नगर सहयाद्री
ओडिशा राज्यातून अमली पदार्थांची तस्करी करून जिल्ह्यांमध्ये होलसेल गांजा पुरवणार्या टोळीचा पर्दाफाश करत ८१ लाखांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. १२० किलो गांजासह दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहे.
२९ ऑगस्ट रोजी पथकाला दोन इसम एका ट्रकने ओडीसा राज्यातुन विक्रीसाठी आणलेला गांजा शेंडी बायपास मार्गे आणत असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्यानुसार पथकाने शेंडी बायपास रोडवरील हॉटेल किनाराजवळ सापळा रचला. काही वेळातच संशयित ट्रक (क्र. एम एच १४. झी.यु २१११ ) त्या ठिकाणी दाखल झाला. ट्रक थांबवून त्यातील नवनाथ अंबादास मेटे (रा. श्रीगोंदा) व ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे (रा. मळेगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान, ट्रकच्या केबिनवरील टपावर लपवून ठेवलेल्या सहा गोण्यांमध्ये 30 लाख 22 हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला.
आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा साथीदारांसह तो विक्रीकरीता आणला असल्याची कबुली दिली. याप्रकरणी नवनाथ अंबादास मेटे ( रा. ढोरजे, ता. श्रीगोंदा), ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे ( रा. मळेगांव, ता. शेवगांव ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अनंत सालगुडे करत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील पोलीस उपनिरिक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, दिपक घाटकर, फुरकान शेख लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, अमृत आढाव, आकाश काळे, रमिझराजा आतार, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान धुळे, उमाकांत गावडे, अरुण मोरे, जयराम जंगले यांच्या पथकाने बजावली आहे.