Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी दुर्घटना घडली आहे. धामचे पीठाधीश धीरेंद्र शास्त्री यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी आज सकाळी आरतीनंतर याठिकाणी टिन शेड कोसळले.यादरम्यान एका भक्ताच्या डोक्यावर लोखंडी अँगल पडला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इतर १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान,या दुर्घटनेत जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
छतरपूर जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, एकाला मृत अवस्थेत आणण्यात आले होते. त्याचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. एका रुग्णाचे सीटी स्कॅन करण्यात आले आहे. त्याची प्रकृती ठीक आहे. जखमी भक्ताने सांगितले की, सकाळी ७.३० च्या सुमारास हा अपघात झाला, जेव्हा लोक पावसापासून वाचण्यासाठी तंबूखाली जमले होते. मृत भक्ताचे नाव राजेश कुमार कौशल असे आहे, जो अयोध्येचा रहिवासी आहे. तो बुधवारी रात्री त्याच्या कुटुंबातील ६ सदस्यांसह बागेश्वर धाम याठिकाणी पोहोचला होता. शुक्रवारी धामचे पीठाधीश धीरेंद्र शास्त्री यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या दर्शनासाठी ते आले होते.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा वाढदिवस बागेश्वर धाममध्ये एक मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो, ज्यामध्ये देशभरातील लाखो भाविक सहभागी होतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त धीरेंद्र शास्त्री यांनी भाविकांना भेट म्हणून त्यांना विटा दान करण्याचे आवाहन केले आहे. या विटाचा वापर रुग्णालय बांधण्यासाठी केला जाईल. अलीकडेच धीरेंद्र शास्त्री यांनी कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी केली होती.