अहिल्यानगर । नगर सहयाद्री
येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी विधानभवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भिंगार शहरासाठी स्वतंत्र क वर्ग नगरपालिका अस्तित्वात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून नगरपालिकेसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात भिंगार, पुणे, खडकी, छत्रपती संभाजीनगर येथील देवळाली, कामठी छावणी मंडळ महापालिका व नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याबाबत बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, भिंगार छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे आदी उपस्थित होते. भिंगार छावणी मंडळ महापालिकेत विलीन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी याबाबतचा ठराव सादर केला.
अहिल्यानगर शहर व भिंगार भौगोलिकदृष्ट्या संलग्नता त्यामुळे भिंगार शहर महापालिकेत समाविष्ट करू नये, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. यादृष्टीने बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आमदार संग्राम जगताप यांनी भिंगार शहर महापालिकेत समाविष्ट करणे शक्य नसेल तर भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, अशी मागणी केली. त्यावर भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला. 2011 च्या जनगणनेनुसार भिंगार शहराची लोकसंख्या 28 हजार 986 इतकी आहे.तर भिंगार शहराचे क्षेत्रफळ 12.17 चौरस किलोमीटर इतके आहे.