नवी दिल्ली | वृत्तसंस्था –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ही घोषणा केली.
लालकृष्ण अडवाणी यांच्या भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारत सरकारतर्फे भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आता आज नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर करत असताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली.
मी लालकृष्ण अडवाणी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला असून त्यांना भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती दिल्याचे मोदी म्हणाले.लालकृष्ण अडवाणी अलीकडच्या काळातील सर्वाधिक सन्मान मिळालेले राज्यकर्ते आहेत. अडवाणी यांनी शेवटच्या घटकापासून कामाला सुरुवात करुन उपपंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारत देशाची सेवा केली. त्यांनी गृहमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून देखील काम केले, असे मोदी म्हणाले.
लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेत देखील त्याचे मोठे योगदान होते. भाजपच्या स्थापनेनंतर ते १९८६ मध्ये पहिल्यांदा पक्षाचे अध्यक्ष बनले. १९८६ ते १९९० पर्यंत ते अध्यक्ष होते. १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या कालावधीत देखील लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले. खासदार म्हणून ते जवळपास तीन दशके ससंदीय राजकारणात सक्रीय होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सराकरमध्ये अडवाणी यांनी १९९९ ते २००४ मध्ये देशाचे उपपंतप्रधानपद भूषवले होते.