अहिल्यानगर | नगर सह्याद्री
उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायनी म्हणून ओळखले जाणारे भंडारदरा धरण अखेर पूर्णपणे भरले आहे. आज पहाटे 3 वाजता धरणातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून धरणाच्या स्पीलवेमधून 11,406 क्युसेक आणि वीज निर्मितीसाठी 850 क्युसेक, असा एकूण 12,231 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पाण्याच्या आवकेनुसार, सकाळी 8 वाजता विसर्ग वाढवून 20,763 क्युसेक इतका करण्यात आला आहे. भंडारदरा धरणाची पूर्ण साठवण क्षमता 10,763 द.ल.घ.फू. आहे. धरण भरल्यानंतर, येणारे अतिरिक्त पाणी टप्प्याटप्प्याने सोडले जाणार असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिली.
भिमा नदीत दौंड पूल येथून 69,339 क्युसेक, नांदूर मधमेश्वरमधून गोदावरी नदीत 12,620 क्युसेक, प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून 20,763 क्युसेक, निळवंडे धरणातून 8,640 क्युसेक, घोड धरणातून 20 हजार क्युसेक, सीना धरणातून 364 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
अहिल्यानगमध्ये यलो अलर्ट
राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असतांना अहिल्यानगर जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस होत आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील अकोले येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. तर पुढील चार मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. मंगळवारी पावसाने जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली.
निळवंडे धरणातून विसर्ग
भंडारदरा धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे, खालील बाजूस असलेल्या निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. निळवंडे धरणात 7,266 द.ल.घ.फू. पाणीसाठा होता. पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने साडेसात वाजता 8500 क्युसेक ने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
भंडारदरा आणि निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रवरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी नदीपात्रातील त्यांची चल संपत्ती, वाहने, जनावरे, शेतीची अवजारे आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. तसेच, कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात प्रवेश करू नये. कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.