अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर शहरात पुन्हा हेल्मेट गैंग सक्रिय झाली आहे. काल, शुक्रवारी सकाळी देवदर्शनासाठी जात असलेल्या वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओरबाडले. सकाळी साडेसातच्या सुमारास माळीवाडा भागातील शनि चौकात ही घटना घडली.
याप्रकरणी प्रभावती जयंतीलाल ओसवाल (वय ६५ रा. ब्राम्हण गल्ली, माळीवाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादी काल सकाळी साडेसातच्या सुमारास जैन मंदिर, गुजर गल्ली येथे देवदर्शनासाठी जात असताना शनि चौकात समोरून दुचाकीवर दोघे जण आले. त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील ४० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावले व पसार झाले. त्या दोघांपैकी एकाने तोंडाला मास्क व दुसऱ्याने डोक्यात हेल्मेट घातलेले होते. फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, याच चोरट्यांनी आणखी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र ते दागिने त्यांच्या हाताला लागले नाही. त्या महिलेने पोलिसांत फिर्याद दिलेली नाही. दरम्यान, मागील महिन्यात हेल्मेट गँगने धुमाकूळ घालत नऊ ते १० महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले होते. मध्यंतरी या घटना थांबल्या होत्या. आता पुन्हा काल या गैंगने धुमाकूळ घालत दहशत केली आहे. पोलिसांसमोर त्यांना अटक करण्याचे आव्हान आहे.