शिर्डी । नगर सहयाद्री:-
सर्वधर्म समभाव जोपासणाऱ्या साईंच्या शिर्डीत अनेक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम अनेक सामाजिक संघटना वर्षभर राबवत असतात. साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या संस्थेचे संस्थापक कैलासबापू कोते आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते एकत्र येऊन अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी विवाह सोहळ्याचे आयोजन करतात. कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आजतागायत 2500 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. पोटी एकही मुलगी नसलेल्या कोते दाम्पत्याला हजारो मुलींचे आई वडील होण्याचे भाग्य लाभले आहे.
या विवाह सोहळ्याचे हे २५ वे वर्ष असून, आजपर्यंत दोन हजार पाचशे पेक्षा अधिक वेगवेगळ्या जातीधर्माच्या मुलामुलींचे लग्न पार पडले आहे. यावर्षी 65 जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. कोते दाम्पत्याकडून वधू-वरांना नवे पोशाख, सोन्याच्या मंगळसूत्राची भेट, संसार उपयोगी वस्तू, वऱ्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन दिले गेले. त्यासाठी कोते परिवार आणि नातेवाईक स्वतःच्या मुलींचे लग्न असल्याप्रमाणे तयारी करतात. नवरदेवांची उंट घोड्यावरती मिरवणूक काढली जाते.
यावर्षी 65 जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. ज्यांचा विवाह याठिकाणी पार पडला, त्यांच्या अपेक्षेपेक्षाही छान नियोजन करण्यात आल्याने वधू-वरही समाधानी होते. या विवाह सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील उपस्थिती लावली. अवघ्या एक रुपयात संसासारची सुरुवात होत असल्याने वधू – वरांना आनंद झाल्याचे दिसून आले. या विवाह सोहळ्यातमोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.