अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नो फ्लाय झोन घोषित करत ‘ड्रोन उडवण्यास बंदी’ घातली आहे. हा आदेश ४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ०१ वाजल्यापासून ५ ऑक्टोबर रोजी १२ वाजेपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली आहे. तसेच या आदेशानंतरही ड्रोन वुडवल्यास ड्रोन पाडण्यासाठी अँटी ट्रॉन गणचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा रविवारी (ता.५) अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोणी येथे पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
अलीकडच्या काही काळात नो फ्लाय झोन घोषित करुनही, फोटोग्राफिसाठी कार्यक्रमाचे आयोजक व सहभागी यांचेकडुन ड्रोन उडवण्याचे प्रकार निदर्शनास आले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) अंतर्गत लागू करण्यात आला असून, कोणीही या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असे अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी स्पष्ट केले आहे.