कर्जत । नगर सहयाद्री:-
कर्जत शहरातील मेन रोड हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचा आणि वर्दळीचा आहे. हलके आणि अवजड वाहने या रस्त्याने मोठ्या प्रमाणामध्ये ये जा करत असतात. या रस्त्यावर कोंडी होऊ नये यासाठी कर्जत पोलीस ॲक्शन मोडवर आज आले . या मेन रोडच्या दोन्ही बाजूला पांढरी पट्टी पोलिसांनी मारली असून त्या रेषेच्या आत मध्ये सर्वांनी आपल्या दुचाकी किंवा चार चाकी वाहन लावावे. जर त्या रेषेच्या बाहेर वाहन उभा केले तर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस पथकाने दिला आहे.
कर्जत येथील पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रस्त्यावर फिरून बेशिस्त वाहन उभा करणारे वाहन चालक तसेच व्यापारी यांना सूचना दिल्या. कर्जत शहरातील मेन रोडवर दिवसा व रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक सुरू असते. याशिवाय शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी, पायी जाणारे नागरिक यांची संख्या देखील मोठी आहे. हा रस्ता ओलांडताना प्रचंड वाहतुकीमुळे मोठी कसरत करावी लागते. त्यातच भरधाव जाणारे वाहने यामुळे अपघात देखील होत आहे.
सोमवारी आठवडे बाजारच्या दिवशी तर या रस्त्यावर मोठी गर्दी होत असल्यामुळे सतत कोंडी होते. यामुळे व्यापारी आघाडीच्या वतीने पोलिसांना निवेदन देऊन रस्त्यावर कोंडी होणार नाही यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती देखील करण्यात आली होती.पोलीस प्रशासनाने आज रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केली आहे ती पुढील काळामध्ये कायमस्वरूपी सुरू राहील का असा देखील प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.