अहमदनगर । नगर सहयाद्री
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने आज हायअलर्ट जारी केला आहे. कालच्या तुलनेपेक्षा आज राज्यांमध्ये आणखी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज राज्यामध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे.अहमदनगर जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकड्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अनुमान हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सावधान व सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
नगर जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात १ जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत जिल्ह्यात १७७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. बहुतांशी तालुक्यात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे ४ लाखांपेक्षा अधिक खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र नगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. सोमवारपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढचे दोन दिवस भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात वादळी वारा,विजेच्या कडकड्यासह अतिवृष्टीच्या पावसाचा इशारा दिला आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
मान्सूनच्या पावसाची अरबी समुद्रातील शाखा सक्रिय असल्यामुळे पुढील ४ दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर आणि घाटाच्या परिसरात जोरदार पावसाचा, तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भ, तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप
विजेच्या कडकड्यासह मुसळधार पाऊस गेल्या ४८ तासांपासून संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत.सखल भागात पावसाचं पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे नागरिकांना पावसातून वाट काढावी लागत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं आहे. अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे. दरम्यान, पावसाचा हा जोर असाच कायम राहणार असून आजपासून पुढील तीन दिवस जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.