मुंबई । नगर सहयाद्री
अवकाळी गेल्यानंतर आता उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्हे सर्वाधिक हॉटस्पॉट ठरले आहेत. तापमान 44 ते 45 डिग्रीवर पोहोचलं आहे. महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम असून, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेने कहर केला आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. अमरावती आणि अकोला येथे पारा ४४ अंशांवर, तर नागपूर, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, गडचिरोली येथे ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
जळगाव, जेजुरी, मालेगाव, धाराशिव, परभणी, गडचिरोली आणि नाशिक येथे पारा ४२ अंशांवर गेला. आज (२३ एप्रिल) या भागांत उष्णतेचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने आज अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूरमध्ये उष्ण लाट येण्याचा इशारा दिला आहे.
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, तर मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड येथे देखील उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांसाठी हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. नागरिकांनी दुपारच्या उन्हात शक्यतो बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि गरज असल्यासच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. साधारण १४ जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. या जिल्ह्यांमध्ये उष्ण तर काही ठिकाणी दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
देशभरात तापमान चढत असून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव मध्य भारत, उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारतातील अनेक भागांत २८ एप्रिलपर्यंत जाणवणार आहे. दुसरीकडे, ईशान्य भारतात २७ एप्रिलपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. २१ एप्रिल रोजी विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. या भागातील तापमान सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांनी अधिक असल्याचे निदर्शनास आलं.