Maharashtra News: मार्च महिना सुरू होताच उन्हाळ्याची चाहूल लागते, पण यंदा फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे. फेब्रुवारी महिना संपायला अजून आठवडा शिल्लक असतानाच मे महिन्यासारख्या कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. अशातच राज्यात आज उष्माघाताने पहिला बळी घेतला. सांगलीतील हिराबाग कॉर्नर येथे गारेगार विव्रेता रामपाल याला अचानक उष्माघातामुळे भोवळ आली. त्यानंतर रक्ताच्या उलटय़ा झाल्या आणि जागीच मृत्यू झाला. रामपाल असे या व्यक्तीचे नाव असून, ते परप्रांतीय विक्रेते होते.
प्राथमिक माहितीनुसार, रक्ताच्या उलट्या होऊन त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच तापमानाने पस्तीशी ओलांडली आहे. सोलापूर आणि नागपूरमध्ये तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत, आणि संसर्गजन्य आजारांची लागण होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या ३ ते ४ दिवसांत किमान आणि कमाल तापमानात २-३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सोलापूर आणि नागपूरमध्ये तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन, यंदा शाळांना ४५ दिवसांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.