अहमदनगर | नगर सह्याद्री:-
महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरीयाणा व नवी दिल्ली येथील शंभरहून अधिक युवकांना लष्करात भरतीचे आमिष दाखवून व देहरादून, नगर जिल्ह्यात बनावट ट्रेनिंग कॅम्प उभारून बनावट भरती करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. नगरच्या भिंगार कॅम्प पोलिस व पुण्याच्या मिलीटरी इंटेलिजन्स दक्षिण कमानने संयुक्त कारवाई करत एकास नगर जिल्ह्यातून जेरबंद केले. सत्यजित भरत कांबळे (रा. श्रीगोंदा, जि. नगर) असे त्याचे नाव आहे. प्रत्येक युवकाकडून सुमारे सात ते आठ लाख रुपये उकळण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
आर्मी कॅम्प, मुठी चौक, जामखेड रोड, नगर येथे ६ फेब्रुवारी २०२२ ते २८ मे २०२२ या काळात सत्यजित भरत कांबळे (रा. श्रीगोंदा, जि. नगर), बापू छबु आव्हाड (रा. आंबेगाव, पो. पाचोरा, ता. येवला, जि. नाशिक), राहुल सुमंत गुरव (रा. चौसाळा, जि. बीड) यांनी संगणमत करून भगवान काशिनाथ घुगे (रा.पास्ते, ता.सिन्नर.जि. नाशिक) यांच्यासह इतर शेकडो युवकांना आम्ही आर्मीमध्ये मेजर पदावर नोकरीस असल्याचे भासवून नोकरी देण्याचे आमिष दाखविले.
महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा व नवी दिल्ली येथील युवकांना संपर्क करुन त्यांना विविध ठिकाणी बनावट ट्रेनिंग सेंटर येथे बोलवून त्यांना ट्रेनिंग दिले. त्यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम व आरटीजीएस, ऑनलाईन स्वरूपात रक्कम घेऊन फसवणूक केल्याची तक्रार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पथक व मिलिटरी इंटेलिजन्सच्या पुण्याच्या दक्षिण कमानच्या पथकाने तपास करत सत्यजित भरत कांबळे हा दिल्ली येथे रहात असल्याची माहिती मिळवली. पथक दिल्लीत शोध घेत असल्याचे सुगावा लागताच कांबळे हा महाराष्ट्रात पळून गेल्याचे समोर आले.
पथकाने त्याचा शोध घेत बेलापुर (ता. श्रीरामपुर, जि. नगर) येथे सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याने इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. यामध्ये एक महिला दलालही सामिल असल्याचा संशय आहे. भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात संपर्क साधून युवकांना गळाला लावायचे महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरीयाणा व नवी दिल्ली येथील भरतीपूर्व प्रशिक्षण सेंटरमध्ये संपर्क करुन युवकांना देहरादून व नगर येथील आर्मी परीसरात बोलावायचे. युवकांना प्रशिक्षण देऊन व पैसे देण्या-या उमेदवारांना सेना दलातील मुख्या अभियंता अधिकारी आणि सेवानिवृत्त दक्षिणी कमान मुख्यअधिकारी यांच्या नावाने बनावट नियुक्ती पत्र द्यायचे. त्यांनी जंगल परिसरात बनावट ट्रेनिंग कॅम्प उभारले होते, असे तपासात समोर आले आहे.