मुंबई । नगर सहयाद्री:-
चीनमध्ये एचएमपीव्ही या नव्या व्हायरसने शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे.काल (सोमवारी) भारतातील कर्नाटकच्या बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातही या एचएमपीव्ही व्हायरसने शिरकाव केला असून नागपूरमध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशात आतापर्यंत सात लोक या विषाणूचे बळी ठरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील मेडिट्रिना या खासगी रुग्णालयात सदर रुग्णांवर उपचार सुरू होते. येथील दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आल्याच खाजगी रुग्णलायांतून सांगितले जात आहे. एका सात वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलीचा रिपोर्ट ३ जानेवारीला खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आला आहे. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नाही.
दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती आहे. खाजगी प्रयोगशाळेत या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी सदर रुग्णांची पुन्हा एकदा तपासणी एम्समधील आयसीएमआर द्वारा संचालित प्रयोगशाळेत केली जाईल. त्यानंतर शासकीय प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेन्सीमग केली जाईल. यानंतरच हे रुग्ण एचएमपीव्हीचे अथवा इतर हे स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे. तसेच हे दोन्ही मुले बरी असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे की,याबाबत आपण एक बैठक बोलावली आहे. हा विषाणू यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. फक्त चीनमध्ये त्याची संख्या झपाट्याने वाढल्याने चीनने काळजी घेण्याचे काम केले आहे. आपल्याकडे याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. आपली संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभाग नागरिकांना योग्य त्या सूचना देतील. नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरण्याचे काहीही कारण नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.