मुंबई / नगर सह्याद्री :
महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं संकट आलं आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ आणि अरबी समुद्रातील वादळामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात यलो व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा ताप कायम असताना गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांत पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. अशातच आता राज्यावर दुहेरी चक्रीवादळाचं संकट आलं आहे. पुढील काही तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान या वादळाचा तडाका महाराष्ट्राला बसणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात खोलवर वादळ घोंगावत आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळ आलं आहे. येत्या २४ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. एकीकडे वादळ तर दुसरीकडे चक्रीवादळ यामध्ये महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये अति मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले मोंथा चक्रीवादळ २८ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारी भागात, मच्छलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकीनाडा जवळ धडकेल असा अंदाज आहे. चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्यामुळे आंध्र प्रदेशातील किमान पाच जिल्हे हाय अलर्टवर आहेत. या जिल्ह्यांमध्ये काकीनाडा, पूर्व गोदावरी, कोनासीमा, एलुरु आणि पश्चिम गोदावरी यांचा समावेश आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत.
किनाऱ्यालगतच्या धोकादायक भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या सगळ्याचा महाराष्ट्रावर गंभीर परिणाम होणार आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार २८ ऑक्टोबर रोजी विदर्भ-मराठवाड्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भाच्या आजूबाजूच्या पट्ट्यात रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मोंथा चक्रीवादळामुळे पाऊस कायम राहणार आहे.



