PAN Card Update: सरकारने पॅन 2.0 लाँच केले आहे. याद्वारे डुप्लिकेट पॅन पूर्णपणे काढून टाकण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. असे असूनही, जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील तर सावध व्हा. होय, आयकर विभागाने डुप्लिकेट पॅन कार्डधारकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार, तुम्ही तुमचे अतिरिक्त पॅन कार्ड सरेंडर केले नाही तर तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. अशा परिस्थितीत एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्राप्तिकर कायदा 1961 नुसार, कोणत्याही करदात्याला एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवता येत नाही. जर एखाद्याने चुकून किंवा जाणूनबुजून डुप्लिकेट पॅनकार्ड बनवले असेल, तर त्याने ते तात्काळ सरेंडर करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास सरकार त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करू शकते. सरकारने अलीकडेच पॅन 2.0 योजनेला मंजुरी दिली आहे. पॅन आणि टॅनचे व्यवस्थापन सुलभ आणि आधुनिक करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
डुप्लिकेट पॅन कार्ड काढून टाकणे आणि फसवणूक रोखणे हा त्याचा उद्देश आहे. याशिवाय पॅन आणि टॅनची प्रक्रिया पूवपेक्षा अधिक जलद आणि सुलभ करण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेअंतर्गत, सरकार नवीन तंत्रज्ञान वापरत आहे जेणेकरुन एखाद्या व्यक्तीच्या नावावर एकच पॅन कार्ड असेल आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये.
दोन पॅन कार्ड असल्यास काय करावे?
तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास, तुम्हाला अतिरिक्त पॅन ताबडतोब सरेंडर करावे लागेल. यासाठी सर्वप्रथम NSDL किंवा UTIITSL च्या पोर्टलवर जा. यानंतर, पॅन सरेंडर करण्यासाठी फॉर्म भरा. आता आवश्यक कागदपत्रे जोडा आणि फॉर्म सबमिट करा. येथे तुम्हाला सरेंडर केलेल्या पॅन कार्डची पावती मिळेल.