मुंबई । नगर सहयाद्री:-
देशभरात हवामानाचे विविध रंग पाहायला मिळत असताना, महाराष्ट्रात मात्र उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागच्या माहितीनुसार, पुढील 24 ते 48 तासांत देशभरातील हवामानात बदल दिसून येणार आहेत. तसेच उत्तर भारतात सोसाट्याचा वारा आणि पश्चिम हिमालयीन भागात बर्फवृष्टी होणार असली, तरी महाराष्ट्रात मात्र प्रचंड उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये ताशी 30-35 किमी वेगाने वारे वाहणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. तसेच हिमालयीन प्रदेशात एक नवीन पश्चिमी झंझावात येणार असून, यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी होणार आहे.
दरम्यान, फेब्रुवारीपासूनच राज्यात तापमान वाढू लागले आहे आणि सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊनही चाळीशी ओलांडल्यासारखा दाह जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि मराठवाड्यातही उन्हाचा कहर जाणवणार आहे. तसेच किनारपट्टी भागात दमटपणा वाढेल, त्यामुळे मुंबईकरांना लवकर दिलासा मिळण्याची शक्यता नाही.