अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:-
नगर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका कंपनीत तयार करण्यात आलेले भेसळयुक्त तूप शहरात सिलबंद डब्यांतून मोठ्या प्रमाणात विकले जात होते, आणि याचा पर्दाफाश अन्न व औषध प्रशासनाने केला आहे. या प्रकरणी विक्रेता, पुरवठादार आणि उत्पादक कंपनीवर जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेहता एंटरप्रायजेस या दुकानातून विक्रीस असलेल्या तुपाचे नमुने अन्न प्रशासनाने गेल्या वर्षी घेतले होते. हे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अहवालात या तुपामध्ये भेसळ आढळून आल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
या तपासाच्या अनुषंगाने अन्न प्रशासनाने सखोल चौकशी केली असता, हे तूप पुण्यातील ‘श्री रेणुका फूड्स’ या कंपनीने तयार केले असून, वीरचंद हजारीमल घीवाला या पुरवठादाराने नगरमधील विक्रेत्याला दिले असल्याचे उघड झाले आहे. या त्रिसुत्री साखळीत उत्पादक, पुरवठादार आणि विक्रेता या तिघांविरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न प्रशासनाने शहरातील मेहता एंटरप्रायजेस येथून तुपाचे नमुने घेतले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, या तुपात भेसळ आढळून आली आहे. हे तूप त्यांनी पुण्यातील पुरवठादारांकडून मागविले होते. त्यांनी ते रेणुका फुडस कंपनीकडून घेतले होते. विक्रेता, पुरवठादार आणि उत्पादक कंपनीविरोधात येथील जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
– राजेश बडे अन्न व औषध प्रशासन, अन्न सुरक्षा अधिकारी