अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलाचे (वय 14) अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना शनिवारी रात्री बोल्हेगाव परिसरातील प्रेम भारतीनगर येथे घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा बोल्हेगावातील हायस्कूल मध्ये शिक्षण घेत आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता फिर्यादी नेहमीप्रमाणे भाजीपाला विक्रीसाठी घरापासून काही अंतरावर गेल्या होत्या. त्या वेळी मुलगा घरीच होता. रात्री 8:30 वाजता तो आईकडे आला व काही वेळ थांबून आई, मी घरी जातो, असे सांगून निघून गेला. यानंतर रात्री 10 वाजता आई घरी परतली असता मुलगा घरी नव्हता.
त्यावर त्यांनी बहिणीला विचारले असता, मुलगा घरी आला होता, सायकल लावली आणि मावशी, मी बाहेर खेळायला जातो असे सांगून बाहेर गेला, असे तिने सांगितले. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुंबाने तत्काळ परिसरात शोध घेतला, त्याच्या मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे चौकशी केली, परंतु त्याचा काहीही तपास लागला नाही. अखेर, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस मुलाचा शोध घेत आहेत.