अहिल्यानगर | नगर सह्याद्री
वापरण्यासाठी दिलेली कार परत न करता खासगी नोकरदाराचा विश्वासघात केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अर्ज चौकशीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज दिलीप बारंगुळे (वय 35 रा. बँक ऑफ इंडिया जवळ, देहु रस्ता, पुणे) यांनी शनिवारी (16 नोव्हेंबर) दुपारी फिर्याद दिली आहे.
शिवाजी गजानन शिंदे (रा. डी. एस. के. विद्यानगरी सोसायटी, सुसे रस्ता बानेर, पुणे), स्वप्निल ढोणे (पूर्ण नाव नाही, रा. रावेत, पुणे) व हेमंत बालवडकर (पूर्ण नाव नाही, रा. बालेवाडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिवाजी शिंदे याने पृथ्वीराज बारंगुळे यांची कार (एमएच 12 पीझेड 5003) नोव्हेंबर 2022 मध्ये मार्केट यार्ड, अहिल्यानगर येथील संभाजी शिंदे यांच्या गाळ्या जवळ घेतली होती.
मात्र शिवाजीने पृथ्वीराज यांना ती कार पुन्हा परत केली नाही. उलट त्याने त्या कारची परस्पर स्वप्निल ढोणे व हेमंत बालवडकर यांना विक्री केली. पृथ्वीराज यांनी स्वप्निल व हेमंत यांच्याकडे कारची मागणी केली असता त्यांनी शिवीगाळ करून धमकी दिली व कार देण्यात नकार दिला. आपला विश्वासघात झाला असल्याचे पृथ्वीराज यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. अर्ज चौकशीनंतर शनिवारी (16 नोव्हेंबर) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत.