Crime News : सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात दोन जिवलग मित्रांनी टोकाचं पाऊल उचलत जीवनयात्रा संपवलीय. एका मित्राने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या मित्रानं टोकाचे पाऊल उचल्याची माहिती आहे. आपल्या मित्राचं अचानक असं आयुष्यातून निघून जाणं दुसऱ्या मित्राला सहन झालं नाही. या दुःखातून दुसऱ्या मित्राने हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, वांगी गावातील गोरख भोई आणि सुरेश भोई असे आत्महत्या केलेल्या दोन मित्रांची नावे आहे. गोरख भोई यांनी शुक्रवारी रात्री आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. शनिवारी गोरख भोई याचा अंत्यविधी सुरू असताना सुरेश भोईला हे दुःख सहन न झाल्याने तिथून निघून गेला. त्यांनतर सुरेश याने एकांतात शेतात जाऊन झाडाला दोर लटकून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती.
दक्षिण सोलापुरातील मंद्रूप पोलीस ठाण्यात या दोन्ही आत्महत्याची स्वतंत्रपणे नोंद करण्यात आली आहे. गोरख आणि सुरेश या दोघांनीही आत्महत्या का केली? याचा तपास सध्या पोलीस करतायत. मात्र या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली असून दोन्हीं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



