अहमदनगर । नगर सहयाद्री:-
भिंगारमध्ये लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या भिंगार येथील जनसंपर्क कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी यांच्या पुढाकाराने साजरा झालेल्या आनंदोत्सवात महिलांनी एकमेकींना पेढे भरविले.
या आनंदोत्सवाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, ज्येष्ठ नेते सुदाम गांधले, सरचिटणीस विशाल (अण्णा) बेलपवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शिवम भंडारी, मतीन ठाकरे, दीपक लिपाणे पाटील, अक्षय नागापुरे, राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे शहर जिल्हा उपाध्यक्ष फरीद सय्यद, राजू नायर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष संकेत झोडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पै. सागर चवडंके, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे उपाध्यक्ष करण पाटील, योगेश उबाळे, अनिल शिंदे, बनकर महाराज, कमलेश राऊत आदींसह परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या.
शिवम भंडारी म्हणाले की, महायुती सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे महिलांना सन्मानपूर्वक खात्यात पैसे वर्ग केले. विरोधकांनी योजना फसवी असल्याचा अपप्रचार केला, मात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने त्यांची बोलती बंद झाली आहे. या योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, रक्षाबंधनानिमित्त महिलांना भावाकडून ओवाळणी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. संजय सपकाळ म्हणाले की, महिलांना आधार व सन्मान देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. रक्षाबंधन पूर्वीच महिलांच्या खात्यात पैसे वर्ग करून सरकारने दिलेला शब्द पाळला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने जाचक अटी देखील कमी केल्या. तर आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून जास्तीतजास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांचे अर्ज भरून देण्यात आले. भविष्यातील निवडणुकांमध्ये सर्व महिला वर्ग महायुतीच्या उमेदवार असलेल्या आपल्या भावाच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारने २८ जून रोजी जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यासाठी महिलांचा गोंधळ उडाला असताना आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व उपनगरांत अर्ज भरून देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यामुळे अनेक महिलांना सहजरीत्या अर्ज भरून या योजनेचा लाभ घेता आल्याबद्दल महिलांनी त्यांचे आभार मानले.