१४,२९८ पुरुषांनी घेतला लाभ; २१.४४ कोटींचा अपहार
मुंबई। नगर सहयाद्री
महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोळ उघड झाला आहे. महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ तब्बल १४,२९८ पुरुषांनी घेतल्याचे उघडकीस आले आहे. या पुरुषांच्या खात्यात दहा महिन्यांपासून दरमहा १५०० रुपये जमा होत होते. एकूण २१.४४ कोटी रुपयांचा निधी चुकीच्या पद्धतीने पुरुष लाभार्थ्यांना वितरित झाल्याचे प्रशासनाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.
ही योजना ऑगस्ट २०२४ पासून महिलांसाठी सुरु करण्यात आली होती. मात्र ऑगस्ट २०२४ ते जून २०२५ या कालावधीत पुरुषांच्या खात्यातही पैसे जमा होत राहिले. यामुळे अनेक महिलांना अद्यापही योजनेचा पूर्ण लाभ मिळालेला नाही, तर काहींना अजिबातच नाही. ही गंभीर चूक कशी झाली, हे प्रशासनाच्या तपासणीत आले नाही, यावर आता सवाल निर्माण झाला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या डेटामध्ये अलीकडेच पडताळणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
यातून अडचणीत आलेल्या इतर योजनांवरही परिणाम झाला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एकूण ४२ हजार कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत, त्यातील मोठा वाटा चुकीच्या लाभार्थ्यांकडे वळाला आहे. याशिवाय आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे २,३६,०१४ लाभार्थ्यांच्या नावांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही नावे महिलांची असली तरी प्रत्यक्ष लाभ पुरुषांनी घेतल्याचा संशय आहे. सद्यस्थितीत या अर्जांची चौकशी सुरु असून, संबंधित खात्यांचा लाभ तत्काळ थांबवण्यात आला आहे.