अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केला आहे. रविवारी दुपारी मातोश्री येथे पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळे यांच्या हाती शिवबंधन बांधत मशाल दिली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, किरण काळे सारखे लढवय्ये नेतृत्व आता शिवसेनेमध्ये आले आहे. त्यांचा प्रवेश म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध येणे नव्हे तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेला नेण्याचे काम ते करत आहेत असे म्हणत ठाकरे यांनी काळे यांचे स्वागत शिवसेनेत केले.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काळे समर्थकांनी मातोश्री परिसर दणाणून सोडला. काही दिवसांपूव काळे यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते शिवसेना उबाठात प्रवेश करतील अशी चर्चा होती. अखेर त्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
यावेळी शिवसेना नेते तथा प्रवक्ते खासदार संजय राऊत, उपनेते साजन पाचपुते, अहिल्यानगर शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले, ज्येष्ठ शिवसैनिक रावजी नांगरे, डॉ. श्रीकांत चेमटे, किरण बोरुडे, दिलदार सिंग बीर, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास शिंदे, सूरज ठोकळ, मनीष गुगळे, ऋतुराज आमले, जेम्स आल्हाट, सुजय लांडे, भाकरे महाराज, उमेश काळे, किरण डफळ, दत्तात्रय गोसंके, मुन्ना भिंगारदिवे, अमित लद्दा आदींसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी उबाठा सेनेत प्रवेश केला.
शहरात शिवसेना मजबूत करणार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदू धर्मरक्षक स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या विचारांना अभिप्रेत असणाऱ्या, तसेच शहरातील गोरगरीब, व्यापारी, उद्योजक, नोकरदार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह सर्व घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी काम करणार आहे. शहरात शिवसेनेची भक्कम संघटना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बांधणार आहे.
शहराचा विकास हा माझ्या कामाच्या केंद्रस्थानी असेल. काही लोक बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरून सध्या शहरामध्ये वावरत आहेत. त्यांचा बुरखा शिवसैनिक फाडतील. ओरिजिनल हिंदुत्व काय असतं हे आम्ही दाखवून देऊ. जुन्या, नव्या शिवसैनिकांचा मेळ घालून आगामी काळात शहरामध्ये आम्ही निश्चित भगवा फडकवू असा ठाम विश्वास यावेळी किरण काळे यांनी व्यक्त केला.