रमी व्हिडीओनंतर पत्रकार परिषदेत सरकारलाच ठरवले ‘भिकारी’, विरोधक आक्रमक
नाशिक | नगर सहयाद्री:-
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारलाच ‘भिकारी’ ठरवणारे वक्तव्य करून पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना कोकाटे म्हणाले, “शेतकऱ्यांकडून शासन १ रुपया घेतं. शासन शेतकऱ्यांना १ रुपया देत नाही. म्हणजे भिकारी कोण? शासन आहे, शेतकरी नाही.” त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटेंचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत जोरदार टीका केली.
महाराष्ट्राच्या जनतेच्या, राज्यकर्त्यांच्या आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचा हा घोर अपमान आहे. महाराष्ट्राला ‘भिकारी’ म्हणणे ही असंवेदनशीलतेची परिसीमा आहे,” असे म्हणत त्यांनी कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलता नसणारे कृषीमंत्री या राज्याने कधी पाहिले नव्हते. सभागृहात रमी खेळणे आणि नंतर राज्यालाच भिकारी म्हणणे, हे सहन केले जाणार नाही. असे म्हंटले आहे.