८० किलो मांस जप्त, एकावर गुन्हा दाखल / तोफखाना पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील कोठला झोपडपट्टी परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे गोमांस विक्री सुरू असल्याचा प्रकार तोफखाना पोलिसांनी उघडकीस आणला आहे. बुधवारी (दि. ५) दुपारी ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात पोलिसांनी १६ हजार रुपये किमतीचे ८० किलो गोमांस, तसेच सत्तुर आणि सुऱ्यासह एकूण १७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी, आरोपी फिरोज शमशेर शेख (वय ५०, रा. कोठला झोपडपट्टी, अहिल्यानगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुजय विल्यम हिवाळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, दि. ०५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कोठला झोपडपट्टी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी फिरोज शेख हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गोमांस विक्री करत होता. महाराष्ट्र राज्यात गोवंश जातीच्या मांसावर बंदी असतानाही तो हा प्रकार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना १६,००० रुपये किमतीचे ८० किलो गोमांस (२०० रुपये प्रति किलो), १,००० रुपये किमतीचा एक लोखंडी वजनी काटा, २०० रुपयांचा लोखंडी सत्तुर आणि २०० रुपयांचा एक लोखंडी सुरा असा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी फिरोज शेख याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरख काळे हे करत आहेत.



