दीड लाखाचे ५३० किलो मांस जप्त, चौघे अटकेत, दोघे फरार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील झेंडीगेट परिसरात एका चिकन विक्रीच्या दुकानात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोमांस विक्रीच्या मोठ्या अड्ड्याचा कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रविवारी (दि. २६) पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास मलकी फ्रेश चिकनफ या दुकानावर छापा टाकून ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ लाख ५९ हजार रुपये किमतीचे अंदाजे ५३० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल आण्णासाहेब तनपुरे यांना झेंडीगेट येथील अशरफी मस्जिदच्या बाजूला असलेल्या लकी फ्रेश चिकन या दुकानात बेकायदेशीरपणे गोमांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. महाराष्ट्रात गोवंश हत्या आणि गोमांस विक्रीवर बंदी असतानाही हा प्रकार सुरू होता.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, कोतवाली पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास सदर दुकानावर छापा टाकला. यावेळी आरोपी हे गोवंशीय जनावरांची कत्तल करून आणलेले मांस विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून चार आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये तोहिद नूर कुरेशी (वय १९, रा. डावरेगल्ली, झेंडीगेट), सोहिल इकबाल कुरेशी (वय २६, रा. सदरबाजार, भिंगार), समिर शफिक कुरेशी (वय ३३, रा. सदरबाजार, भिंगार) आणि रिजवान महम्मद हुसेन कुरेशी (वय ३६, रा. सदरबाजार, भिंगार) यांचा समावेश आहे.तर कैफ मुत्रावर कुरेशी व वाशिफ मुत्रावर कुरेशी (दोघे रा. सुभेदारगल्ली, झेंडीगेट) हे दोघे जण पोलिसांची चाहूल लागताच फरार झाले. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५९ हजार रुपये किमतीचे ५३० किलो गोमांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात आलेला ५०० रुपये किमतीचा लोखंडी सत्तुर व सुरा असा एकूण १ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहेत.



